चांदवड तालुक्यात अनेक किल्ले आहेत. रासलिंग हा किल्ला जरी नसला तरी इतिहासात याचे महत्त्व किल्ल्या इतकेच अनन्यसाधारण आहे.
ही वास्तू चांदवड शहराच्या वायव्येस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ च्या डाव्या हाताला शिखरा सारखा दिसणाऱ्या डोंगरावर स्थित आहे. हा डोंगर आणि ही वास्तू चांदवड मधून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते व सर्वांनाच विचारात पाडते.
रासलिंग किंवा इंद्रेश्वर हे एक
टेहळणीचे म्हणजेच निरीक्षणाचे (
watchtower) ठिकाण होते.
चांदवडहुन जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर होत, याचे बांधकाम मुद्दामहुन मंदिरासारखे केले होते, जेणेकरून शत्रूस हे एक मंदिर वाटावे व पहारेकरी भाविकां सारखे.
हे स्थान टेहळणीसाठी (निरीक्षणासाठी) अगदी योग्य होते, हे इथे गेल्यावरच समजते. शत्रूचा अंदाज आला की पहारेकरी ईशारा (खूण) पाठवत असे. व गावातील रंगमहालातील सैनिकाला सावध करीत असे.
रासलिंग मंदिर हे १० फूट × १० फूट चे चपटी विटांचे बांधकाम होळकर कालीन आहे. पूर्वेला त्याचे दार आहे व एक मोठी खिडकी उत्तरेकडे आहे. इथून घाटातील संपूर्ण परिसर दिसतो. मंदिरात छोटेखानी शिवलिंग आहे, याव्यतिरिक्त काही नाही. थोडे खाली आल्यावर डोंगरात बनवलेले छोटेसे पाण्याचे टाके आहे, याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी होतो.
जाण्याचे मार्ग
१. राष्ट्रीय महामार्गाच्या डाव्या हाताला मेडिकल कॉलेज च्या बाजूने स्मशानभूमी येथून सरळ पुढे गेल्यावर आपण खोकड तलावाच्या सोंडेपर्यंत येऊन पोहोचतो, इथून खोकड तलाव डाव्या हाताला ठेवून वर चढायला सुरुवात करावी. एक पक्की पाय वाट डोंगराला फेरा मारून वर घेऊन जाते. या मार्गाने जाण्यासाठी साधारण ३० ते ४० मिनिटे लागतात. चढाई फार सोपी स्वरूपाची आहे.
२. एस एन जे बी कॅम्पस मधून ब्राह्मण टेकडीवर चढाई करुन देखील पुढे रासलींग वर जाता येते. हा मार्ग मध्यम स्वरूपाचा आहे.
३. राशेवाडी शिवारातून दाट झाडींमधून सरळ वर रासलिंग ला जाता येते. हा मार्ग अवघड स्वरूपाचा आहे व फारसे कोणी या मार्गाने जात नाही.
आधी आडवळणाचा वाटणारा डोंगर, आता या ठिकाणी जाण्याचा तरुणाईचा कल वाढला आहे. मंदिराची काही प्रमाणात पडझड झाली आहे. तरी सध्या वास्तू सुस्थितीत आहे.
पावसाळ्यात याचे सौंदर्य काही वेगळेच होते.
तर मग आपण कधी हा आगळा वेगळा अनुभव घेण्यासाठी रासलिंग ला जाताय ना ....?
Comments
Post a Comment