चांदवड गावाच्या उत्तरेला तांबकडा परिसरात एका डोंगरकड्यावर श्री चंद्रेश्वर महादेवाचे पुरातन स्थान आहे.
त्या स्थानाचा महिमा असा आहे की, भोज राजा विक्रम ह्याची श्री शनिदेवांच्या वक्रदृष्टीतून मुक्तता झाल्यावर चांदवडचा राजा चंद्रसेन ह्याने आपली मुलगी चंद्र्कलेचा विवाह राजा विक्रमाशी ह्याच गडावर लावून दिला व ५२ मंदिरांची स्थापना केली. पण मुगलांच्या हल्ल्यात हा परिसर नष्ट झाला व नंतर ह्या परिसराला ग्रहण लागले.
त्यानंतर येथे चंद्रेश्वरचे पहिले महाराज श्री दयानंद स्वामी आलेत.
त्यांना ह्या जागेचा स्वप्नांत दृष्टांत आल्याचे म्हणतात. आज जेथे मंदिर आहे तो भाग शेणामातीने भरलेला होता. बाबांनी तो स्वच्छ करून तेथे श्री शंभूची पुनर्स्थापना केली. आजही चंद्रेश्वरला मुख्य मंदिरासमोर स्वामी दयानंदांची समाधी व श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे.
येथे भग्नावस्थेतला १७ व्या शतकातला चौघडा बघायला मिळतो.
महाराज दयानंदानंतर श्री विद्यानंद ह्यांनी ती ५२ मंदिरे बांधण्याचा संकल्प सोडला, काही मंदिरे बांधलीसुद्धा;पण संकल्प अपूर्णच राहिला व स्वामींना देवाज्ञा झाली.त्यानंतर तिसरे चंद्रेश्वर बाबा श्री बंसिपुरीजी महाराज,चौथे श्री दयालपुरीजी महाराज ह्यांनी परिसरात भरपूर सुविधा केल्यात.सध्या जयदेवपुरीजी महाराज मंदिराचा कारभार बघतात. मंदिराचे सर्वाधिकार ‘श्री संस्थान महामंडलेश्वर,हरिद्वार’ यांच्याकडे आहेत.
चंद्रेश्वर मंदिर हे अतिशय सुबकरीत्या कोरलेल्या कलात्मक मुर्त्यांमुळे आकर्षक दिसते. सभामंडपात कोरीव कामाचा उत्तम नमुना असणारा नंदी लक्ष वेधून घेतो. गाभाऱ्यातील सुबक शिवलिंग मनोरम आहे. थोडे पुढे गेल्यावर ‘गणेश टाके’ आहे.टाक्यातले थंडगार पाणी पिल्यावर सारा थकवा नाहीसा होतो.बारमाही पाणी हे या गणेश टाकीचे वैशिष्ट्य आहे. दर सोमवार, श्रावणी सोमवार, संपूर्ण श्रावण महिना, महाशिवरात्री,हरिहर भेट, कोजागिरी पौर्णिमा,स्वामी दयानंदांची पुण्यतिथी,व अन्य धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होतात.तसेच उत्सावात गावातून पालखी निघते.पालखीत भगवान शिवाचा चांदीचा मुखवटा,शेषनाग,बाबांची,प्रतिमा,दागिने,ठेवतात. यावेळी सुवासिनी चंद्रेश्वराची पूजा करतात.श्रावणात १ लक्ष बिल्वदले ‘ओम नम: शिवाय’ या जपाने शिवलिंगावर वाहतात. तीर्थक्षेत्रावरून आणलेल्या पाण्याच्या कावडी महाभिषेकाच्या वेळी शिवलिंगावर अर्पण करतात.श्रावण समाप्तीला महाप्रसादाचा व सत्यनारायणाचा कार्यक्रम होतो.आज श्री जयदेवपुरीजी महाराजांमुळे परिसरातील भेकड गायींची गोशाळा,मंदिरात जाण्यासाठी कौन्क्रीटच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत.नवीन रस्त्यांमुळे भाविकांच्या गाड्या थेट गडावर पोहोचत असल्याने आता चंद्रेश्वर गड भाविकांचा एक आवडीचा ‘पिकनिक स्पोट’ बनला आहे.
अशा या पावन चंद्रेश्वरगडाला व परिसराला बघण्यासाठी एकदा अवश्य चंद्रेश्वरला व चांदवडला भेट द्या.
दर्शनाची वेळ: पहाटे ५ ते रात्री ८ .