श्री क्षेत्र चांदवडमधील रंगमहाल पासून जवळच ईशान्येला एक ऐतिहासिक चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार १७४० च्या सुमारास अहिल्याबाई होळकरांनी केला.हे मंदिर हेमाडपंथी असून आतून व बाहेरून संपूर्ण दगडाचे आहे.
मंदिराच्या गाभार्यात उजवीकडे श्रीरामभक्त हनुमान,डावीकडे श्री विष्णूवाहन गरुड,आग्नेयेला सात घोड्यांच्या रथावर श्रीसूर्यदेव तर नैऋत्येला प्रथमेश गणेशाची सुबक मूर्ती लक्ष वेधून घेते. वायव्येला श्री अष्टभुजा जगदंबा,तर ईशान्येला चंद्रदेव विराजित आहेत. मधोमध श्री शंकराची पिंड असून त्यावर सर्पमुद्रा कोरलेली आहे.मंदिरात प्रवेशद्वारासमोरील दगडी चौथऱ्यावरचा आक्रमणास सिद्ध असा उग्र स्वरूपाचा नंदी शिल्पकलेचा मानबिंदू वाटतो.ह्याचे कारण म्हणजे त्याच्या अंगावर असलेली सुंदर व नक्षीदार झूल होय.मंदिराच्या गाभार्यात येण्यासाठीचा दरवाजा हा आकाराने लहान असल्याने आत येतांना वाकून.यावे लागते. ह्या मागचा हेतू एवढाच की,कितीही नास्तिक मनुष्य असला तरीही तो भगवंतासमोर नतमस्तक व्हावा.
काही वर्षांपूर्वी मंदिराच्या आवारात अस्वच्छता,घाणीचे साम्राज्य होते.परंतु श्री रमणशेठ कुलथे व हिंदुराजे मंडळाच्या परस्पर सहकार्याने मंदिराचा विकास झाला.आज महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा,वैकुंठ चतुर्दशी(हरिहर भेट),आदि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात.
तर असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ह्या चंद्रेश्वर महादेव मंदिराला एकवेळ अवश्य भेट द्या.
Comments
Post a Comment