चांदवड बद्दल - About Chandwad

Image
चांदवड जिल्हा : नाशिक  पिनकोड : ४२३१०१ STD कोड : ०२५५६ लोकसंख्या  : २५३४१ (२०११ जनगणना ) वाहन आणि RTO कोड : MH15 , MH41 आमदार : Dr. राहुल आहेर (चांदवड - देवळा मतदारसंघ २०१९) खासदार : भारतीताई पवार (दिंडोरी लोकसभा मतदारसंघ २०१९) चांदवड मधील किल्ले  चांदवड किल्ला (Chandwad Fort) राजदेहेर किल्ला (Rajdeher Fort / Rajdher Fort) इंद्राई किल्ला (Indrayi Fort) धोडप किल्ला (Dhodap Fort)

अहिल्यादेवी होळकर आणि चांदवड (Ahilyadevi - Chandwad)

Ahilyadevi holkar



         अहिल्यादेवी होळकर या एक कर्मयोगिनी होत्या. इ.स. १७२५ ते १७९५ हा त्यांचा जीवनकाल. त्या आठ वर्षांच्या असतांना सुभेदार मल्हारराव होळकर यांची सून म्हणून त्यांच्या घरात आल्या


'होळकर हे मूळचे फलटण भागातील होळ या गावचे. अहिल्याबाई या नगर-आष्टी भागात असणाऱ्या 'चौंडी' गावच्या. माणकोजी शिंदे या गाव पाटलाची ही मुलगी प्रवासकाळात पेशव्यांच्या नजरेला पडली. आणि जुळते गोत्र पाहून त्यांनी तिला मल्हाररावांची सून म्हणून निवडली आणि मल्हाररावांच्या मुलाशी खंडेराव होळकरांशी (Ahilya bai's husband) तिचा विवाह झाला.

मात्र पुढे दुर्दैवाने सूरजमल जाटशी कुंभेरीला युद्ध करतांना खंडेराव कामी आला आणि आहिल्यादेवींना अकाली वैधव्य आले. वीस वर्षांची अहिल्या सती जावयास निघाली. सासरला मल्हारराव भरल्या डोळ्यांनी सूनेची याचना करीत म्हणाला, "पोरी, खंडूजी दैवगतीने गेला. तू मला अंतराय देऊ नकोस, माझा मुलगा म्हणून मुली तू मागे राहा. जगी रहा." आहिल्यादेवीचे मन द्रवले. मरणाच्या दारातून ती मागे फिरली. मल्हाररावांनी सुनेला राज्यकारभाराचे थोडेफार ज्ञान दिले होते. १७६६ मध्ये मल्हारराव होळकर कालवश झाले. अहिल्यादेवीवर दुर्दैवाचा हा दुसरा आघात होता. आता तर परिस्थिती बिकट होती.

मल्हाररावांचा मृत्यू झाला. सुभेदारीचे भवितव्य धोक्यात आले. गंगोबातात्या चंद्रचूड हा दिवाण, राघोबादादा पेशवे देखील मल्हाररावांच्या विधवा सुनेच्या हातून तिची दौलत काढून घेण्याच्या इराद्यात होते. त्यामुळे गंगोबातात्या व राघोबादादाच्या कुटील हालचाली सुरु झाल्या. अहिल्याबाई चा मुलगा मालेराव होळकर सुभेदारीची वस्त्र धारण केल्यावर काही महिन्यातच दगावला. एकापाठोपाठ एक संकट कोसळू लागली. घरातील कर्ते पुरुष कोसळले. बाई मात्र धीराची होती. इतिहासाला तिच्याकडून भव्य - दिव्य कार्य करुन घ्यायचे होते. बाईंनी तुकोजी होळकर नावाच्या मुलास दत्तक घेतले. त्याला होळकरांचा सेनापती केले आणि राज्य प्रशासनाची सूत्रे आपल्या हाती ठेवली.

अहिल्यादेवींनी २८ वर्षे राज्य केले. त्यांनी कानाकोपऱ्यात धर्मशाळा देवळं बांधली. वैधव्य दशा प्राप्त झाल्यापासून साधी राहणी, शरीराचे चोचले पुरविले नाही. त्यांनी चुकूनही मांसाहार घेतला नाही. दैवावर व धर्मावर अढळ श्रध्दा होती. दैनंदिन जीवनात किर्तन, होमहवन, भजन, श्रवण करीत त्यांच्या दैनंदिन जीवनाला सोज्वळ वळण लागले त्या ब्राह्मण व गरीब लोकांना दानधर्म करण्याचे काम करीत दररोज संध्याकाळी देवळात जावून पुराण ऐकत रात्रीचे भोजन आटोपून ११ चे सुमारास झोपत असत असा त्यांचा नित्यक्रम होता.
Ahildabhai in Holkarwada, Rangmahal
 Agilyabhai Holkar real painting




   आजचा रंगमहाल हा देवी अहिल्याबाईच्या काळचा वास्तुशिल्पाचा एक अजोड नमुना आहे. ह्या रंगमहालात इतिहासाची साक्ष पटेल अशी किल्यासारखी रचना चारही बाजूने मोठे बुरुज उत्तरेकडून भरभक्कम असा हत्ती जाईल असा दरवाजा त्याचेवर नगारखाना, आत मुख्यवाडा तोही दणगट भरभक्कम व अवाढव्य, त्यातील संपुर्ण एकजिनसी नक्षीने मढलेले लाकूड कोरीव काम हे अहिल्यादेवीचे वैशिष्टये होय. 
त्यांनी संपूर्ण जातीधर्मासाठी भारतभर बांधलेली देवालये, घाट, बौद्धविहार अस्तित्वात आहेत. त्यांना चारही धामांना जोडणारे रस्ते उभारले. त्यांच्या दुतर्फा झाडांची योजना केली. जेणेकरुन प्रवाशांना उन्हाचा त्रास होणार नाही. घाट, रस्ते, देवळे हे कायमस्वरुपी टिकावे म्हणून पक्क्या दगडांनी त्यांचे बांधकाम करुन घेतले. त्यांनी हे काम - फक्त आपल्या राज्यापुरते मर्यादित न ठेवता गुजरात, तंजावर, राजस्थान अशी सर्व भारतभर कामे केली. राष्ट्रीय एकात्मतेचं हे सर्वात मोठं प्रतिकात्मक काम आहे. त्यांनी सर्व जाती धर्मियांच्या मंदिरांना, मशिदींना कायमस्वरुपी देणग्या व जमिनी दिल्या.
हिमालयातील बद्रिनारायण क्षेत्र, हरिद्वार, रामेश्वर, अमरकंटक, मथुरा, सप्तश्रृंगी या सारख्या तीर्थक्षेत्र धर्मशाळा उभारल्या.
जेजुरीचा तलाव, मंदिर हे त्यांचेच कर्तृत्व आहे, त्यांनी काही मंदिरांचा जीणाद्धार केला. काशीचा विश्वेश्वर,गयेचा विष्णू, सोरटी सोमनाथ, परळीचा वैजनाथ, वेरुळचा घृष्णेश्वर यांना त्यांनी सनाथ केले.
अहिल्यादेवींनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय इतिहासात-संस्कृतीमध्ये 'अढळस्थान' निर्माण केले आहे. शतकानुशतके जात आहेत. कालाचा प्रवाह अखंड सुरु आहे. होळकरांचे सामाज्य गेले. पण ते घाट, मंदिरे, रस्ते, विहिरी या वास्तू आजही सारं सारं अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाची साक्ष देत उभ्या आहेत.

चांदवड अन् अहिल्यादेवींचा संबंध फार घनिष्ट असा होता. होळकरांना चांदवड परगणा कसा मिळाला, याचा संदर्भ 'पेशव्यांची बखर' यात पहावयास मिळतो. इ. स. १७४०-१७६१ या बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांच्या कालखंडात हा संदर्भ सापडतो. तो असा - "भाऊसाहेब नाशिक येऊन मुक्काम केला.
नाशिक जागा पाहून सरकारची मर्जी बहूत आनंदी झाली. यासाठी काही दिवस तेथे राहिले. तेव्हा मल्हारराव होळकर यांनी सरकारात विनंती करुन चांदवड महाल आपणास मागून घेतला. चांदवड परगणा होळकर यांचे हवाली केला."
मल्हाररावांच्या नंतर परिस्थितीमुळे होळकर घराण्याची सारी सूत्रे अहिल्यादेवींकडे आली. होळकरांच्या परगण्यांमध्ये 'चांदवड' देखील असल्याने अहिल्यादेवींचा चांदवडशी संबंध हा आला. त्या धार्मिक सहिष्णू होत्या. त्यांचा चांदवडला मुक्काम असे. चांदवडच्या माता रेणुका देवीवर त्यांची अपरंपार श्रद्धा होती. त्यामुळे रेणुका देवी मंदिराचा जीर्णोद्धार त्याला दगडी कोट, त्यावर कोरीव काम , धर्मशाळा, रेणुकातीर्थ (सरोवर), भव्य प्रवेशद्वार, दगडी पायऱ्या, देखण्या दीपमाळ इ. गोष्टी अहिल्यादेवींनी केल्या. रंगमहालातून देवीमंदिराकडे जाणारे एक भुयार आहे. असं म्हणतात की अहिल्यादेवी त्या भुयारातून देवी दर्शनासाठी जात.
चांदवडला बरेच 'बारव' (विहिर) आहे. त्यामळे गावाला मोठा पाणी पुरवठा होतो. या भव्य पाय विहिरी देखील अहिल्यादेवींनी उभारल्या. आज होळकर ट्रस्ट तर्फ देवीच्या (रेणुका) मंदिराची देखभाल केली जाते. श्री रेणुका मंदिरात अहिल्यादेवींचा सुंदर अर्धाकृती पुतळा आहे. भाविक मंदिरात आल्यावर रेणुका देवीचा जयजयकार करतात. अहिल्यादेवींच्या पुतळयाला देखील प्रणिपात करतात.

आजही अहिल्यादेवीचे स्मरण म्हणून दर पौर्णिमेस व नवरात्र उत्सवात १० दिवस पालखी निघते. ही पालखी सकाळी रंगमहालातुन निघते व लोहार गल्लीतुन रेणूकादेवी मंदिरात जाते व संध्याकाळी शिंपी गल्लीतून रंगमहाल परत येते. या पालखीत अहिल्यादेवींचा फोटो व रेणुका  देवीचा सोन्याचा मुखवटा असतो. ही पालखी वाजत-गाजत निघते. पालखी उचलनारे व ढोल वाजवनारे लोक परंपरेने हे काम करत आहे. रस्त्यात प्रत्येक  घरातुन या पालखीची पुजा केली जाते.

Ahilyadevi holkar palkhi


अशा या अनोख्या पालखीला भेट देण्यासाठी एकवेळ अवश्य चांदवडला भेट द्या.



Ahilyabai holkar palkhi


राणी अहिल्यादेवी होळकर यांचा समग्र इतिहास जाणून घेण्यासाठी भेट द्या: https://ahilyabaiholkar.in 

Comments

Popular posts from this blog

रेणुका देवी चांदवड (Renuka Mata Mandir)

इच्छापूर्ती गणेश मंदिर / गणेशबारितील गणपती /बारीतील गणपती (Ichchhapurti Ganesh temple)

चंद्रेश्वर महादेव मंदिर (Chandreshwar Chandwad)